Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे डेंग्यूच्या आजाराने एका बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सलाबतपूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला संग्राम सचिन खरात (वय १२) या मुलाला अचानक ताप आला. त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले.
मात्र, त्यास काही फरक जाणवला नाही. म्हणून त्यास नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात नेले. तपासणी केली असता त्याला डेंग्यूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर डॉक्टरानी उपचार सुरु केले. मात्र शुक्रवारी पहाटे त्याला अचानक त्रास सुरु होऊन त्याची प्राणज्योत मावळली.
सध्या सलाबतपूर गावात गेल्या महिनाभरापासून डेंग्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण बाहेरून उपचार करत आहे.
गेल्या महिनाभर दिडशे पेक्षा जास्त रुग्णांनी बाहेरून उपचार करून घेतले आहे. गावातील प्राथमिक केंद्रात उपचार होत नसल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
त्यामुळे आरोग्य विभाग नक्की करतय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच गावातील घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे रोगराईचे प्रमाण वाढल्यामुळे नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. संपूर्ण गावातील औषध फवारणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गावामध्ये सर्वत्र भूमिगत गटार आहे. तरी नागरिकांनी घरासमोर सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. शौचालयाचा वापर करून स्थानिक प्रशासनला सहकार्य करावे. डेंग्यू सारख्या भयानक आजाराला आळा घालण्यासाठी घराचा परिसर स्वच्छ ठेवा. तातडीने औषधं फवारणीही करणार आहे.- अझर शेख, सरपंच, सलाबपूर