नगर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गोरक्षनाथ गडावरील तीन दानपेट्या फोडण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. महेश सूर्यभान पवार (वय २५, रा. वाकोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
संजय गुलाब पवार व अनिकेत सोपान पवार व सोनू लहू बर्डे (रा. शिराढोण ) हे तिघे पसार आहेत तसेच पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द येथील दत्त मंदिरात चोरी करणारा किरण पवार हाही फरार आहे. आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मांजरसुंबा (ता. नगर) येथील गोरक्षनाथ गडावर २७ जुलै २०२३ रोजी चोरी झाली होती. गडावरील तीन दानपेट्या फोडून चोरट्यांनी रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी वेगाने फिरवला. गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश सूर्यभान पवार याला पकडण्यात आले. त्याने संजय पवार, अनिकेत पवार व सोनू बर्डे यांच्या मदतीने गोरक्षनाथ गडावरील दानपेट्या फोडल्याचे कबूल केले.
तसेच महेश पवार याने किरण विलास पवार याच्या मदतीने वाघुंडे खुर्द येथील दत्त मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले. किरण पवार हा पसार आहे. पसार आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. महेश पवार याच्याविरुद्ध पारनेर, सुपा व एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरफोडी, चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ. दत्तात्रय हिंगडे, देवेंद्र शेलार, पोना. रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, फुरकान शेख, पोकॉ. रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, बापूसाहेब फोलाने, पोहेकॉ. उमाकांत गावडे, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.