Pathardi News : पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील शेतकरी कारभारी रामदास शिरसाट यांच्या वस्तीवर कापूस चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांकडून शिरसाठ यांचा जागीच खून करण्यात आला. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली.
उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांनाही अटक करावी, अशी मागणी रिपाइंचे संजय डोळसे, सरपंच विजया गिते यांच्यासह ग्रामस्थांनी पाथर्डी पोलिसांकडे केली आहे. शिरसाठ यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी डोळसे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच मिरी येथील एका व्यक्तीने शिरसाट यांच्याशी वाद घातला होता. त्याचबरोबर त्यांच्या वस्तीची राखणदारी करण्यावरूनदेखील गावाजवळील एका व्यक्तीशी त्यांचा वाद झाला होता.
ज्या पत्र्याच्या शेडमध्ये ते झोपलेले होते. त्या शेडमधील लोखंडी पलंगाला करंट सोडण्यात आला होता. असा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आलेल्या संशयाच्या दिशेने देखील तपास करावा,
यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांनादेखील भेटणार असल्याचे डोळसे म्हणाले, निवेदन देतेवेळी सुभाष साळवे, माजी सरपंच आदिनाथ सोलाट, शिवाजी मचे, विक्रम जाधव, रामेश्वर फसले, विजय मचे, गौतम कराळे, विठ्ठल शिदोरे, सुदाम गिते, अक्षय शिरसाठ, माजी सरपंच शंकर शिरसाट, दत्तू कोरडे, गणेश खाडे, गणेश बर्डे, मनीषा शिरसाट, मनकर्णा शिरसाट उपस्थित होते.