अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार झालेली निर्यातक्षम साखर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक (जि. अहमदनगर) येथून विदेशात पाठविण्यासाठी मुंबई येथील व्हिक्टोरिया डॉककडे पहिली मालवाहतूक गाडी रवाना झाली आहे.
दरम्यान, २१ वॅगनमध्ये भरलेली १ हजार ३२९ टन साखर रेल्वेच्या मालवाहतूक गाडीने मुंबईत पोहोचल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. पहिल्या मालवाहतूक गाडीतून यशस्वी वाहतूक झाल्यानंतर दुसरी मालवाहतूक गाडी गुरूवारी किंवा शुक्रवारी रवाना होणार आहे.
२१ वॅगन भरेल एवढी साखर तयार आहे. मालवाहतुकीमुळे कमी वेळेत, कमी भाड्यात, जास्तीचे अंतर पार करून संबंधित कारखान्यांचा माल योग्य स्थळी पोहोचत आहे. दरम्यान कोरोना महामारीत लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रेल्वेच्या प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे.
या काळात रेल्वेने मालवाहतूक गाड्यांवर जास्तीचा भर दिला आहे. नवनवीन गुड्स शेडमधून सध्या मालवाहतूक गाड्या मोठ्या प्रमाणात धावत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार झालेल्या साखर कमी वाहतूक खर्चात जास्तीचे अंतर कापून पोहोचत असल्याने शेतकरी, साखर कारखाना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम