अजित दादा…आमचे बारा वाजण्याची वेळ आली, तरी पुल होईना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर-पिंपरकणे येथील पूल बांधून देण्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री अजित दादा पवार यांनी घेतली होती.

मात्र आमचे बारा वाजण्याची वेळ आली, तरी पुल होईना, अशी खंत धरणग्रस्त शेतकऱ्यांतर्फे माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड व्यक्त केली. यावेळी बोलताना मधुकर पिचड म्हणाले, ‘‘पूल मंजूर होऊन १४ वर्षे उलटली. तरी परिस्थिती जैसे थी आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड यांनी निळवंडे प्रकल्पाच्या वेळी जलाशयाच्या मागील बाजूस राजूर-पिंपरकणे पुलासाठी ३४ कोटी रुपयांचा निधी खास बाब म्हणून मंजूर केला.

तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन प्रसंगी हा पूल २० डिसेंबर २०१२ ला पूर्ण होईल, असा शब्द धरणग्रस्तांना दिला होता.

मात्र आजही पूल अपूर्ण अवस्थेत आहे. प्रवासासाठी करावा लागतो अनेक संकटांचा सामना… गावांना पायपीट करत नदीवर येऊन तेथून होडीतून पलीकडे जाऊन पाच किलोमीटरवर राजूर येथे जावे लागते. दहा किलोमीटर प्रवास ऊन, वारा, पावसात पायी करावा लागतो.

माणसे आजारी पडली, तर पालखी करून राजूर येथे जावे लागते. विद्यार्थ्यांना दररोज असा जीवघेणा प्रवास करतात. ही मरणाची लढाई मागील १४ वर्षांपासून सुरू आहे. दादा, आता तरी हा प्रश्‍न कायमचा सोडवा. भाजप सरकारच्या काळात पुलासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले होते.

तेच काम अजूनही सुरू आहे. नव्याने राज्य सरकारने निधी उपलब्ध करून पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. असे पिचड म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News