वाळू माफियाला हाताशी धरुन पोलीस निरीक्षकाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  अनुसूचित जाती प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे व इतर कार्यकर्त्यांवर जातीय द्वेषातून खोटे पुरावे देत कलम 395 व आर्म अ‍ॅक्ट सारखे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी वाळू माफिया व बेलवंडी (ता. श्रीगोंदा)

पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुनील ओहोळ व जिवाजीराव घोडके यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनात अनिकेत कदम, योगेश खेंडके, सोमा शिंदे, मोहन काळे, बाबा गायकवाड, संजय डहाणे,

महेंद्र थोरात, चेतन कदम, संदीप चव्हाण, किरण सोनवणे, अक्षय सोनवणे, मोहन बोरगे, रणजित डंबाळे आदी सहभागी झाले होते. 28 मे रोजी राजारामचंद्र ढवळे यांनी अनुसूचित जातीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे व इतर कार्यकर्त्यांवर मौजे राजापूर येथील गट क्रमांक 140 मध्ये बंदुकीचा धाक दाखवून माती उत्खनन केल्याची तक्रार बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये दिली.

संतोष शिंदे यांच्या वरती कलम 395 व सशस्त्र अधिनियम 199, 3/25, 4/25 प्रमाणे आर्म अ‍ॅक्ट सारखे गुन्हे दाखल करण्यात आले. हा गुन्हा दाखल करताना हा विषय गौण खनिज उत्खनन संबंधित असताना पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी महसूल विभागाचे कुठलीही चौकशी न करता राजारामचंद्र ढवळे यांना साथ देत हा गुन्हा दाखल केला. या ठिकाणी जो पंचनामा करण्यात आला त्याच्यावरती राजापूर महसूल मंडळातील मंडळ अधिकारी व कामगार तलाठी यांच्या सह्या नसताना खोटा पंचनामा करून खोटी वाहने दाखवून गुन्हा दाखल झाला आहे.

खोटे पुरावे गोळा करुन ढवळे व पोलीस निरीक्षक शिंदे यांनी संगनमताने हा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक पाहाता राजारामचंद्र ढवळे हाच माती व वाळू माफिया म्हणून या भागात परिचित असून, पूर्वी श्रीगोंदा तहसील कार्यालयाने अवैध माती उत्खनन केल्याप्रकरणी ढवळे याला दंड देखील केलेला आहे. पोलीस निरीक्षक शिंदे व ढवळे यांनी जातीय द्वेषातून संतोष शिंदे यांना गावातून बहिष्कृत करण्याचा मोठा कट रचल्याची गावात चर्चा असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

ज्या जमिनीच्या गटामध्ये उत्खनन केल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. तो गट नंबर 140 शासकीय असून, तो घोड धरणासाठी संपादित केलेला असून, पाण्यामध्ये आहे. या गटावरची माती राजारामचंद्र ढवळे यांनी उत्खनन करून त्यांच्या शेतामध्ये घातल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र त्यांचे सख्खे चुलते मारुती बाबा ढवळे यांनी तहसील समोर प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहे.

ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी संतोष शिंदे हे बाहेरगावी होते. तसेच ज्या गाडीचा उल्लेख फिर्यादीमध्ये केलेला आहे, ती गाडी नादुरुस्त असून दोन महिन्यापासून गॅरेज वर आहे. गट नंबर 140 शासकीय असल्याचे तहसीलदार यांना लेखी पत्र दिले आहे. या गटावरची माती उचलल्याचे राजाराम ढवळे फिर्यादी मध्ये म्हणतात तो गट त्यांचा नसून सरकारी आहे.

अशा पध्दतीने खोटे पुरावे गोळा करण्याचे काम पोलिस निरीक्षक शिंदे करत आहे. त्यांना कर्तव्याची जाणीव राहिलेली नसून, केवळ आर्थिक फायद्यासाठी असंविधानिक काम करत आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकून त्रास देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सदर प्रकरणी अनिकेत काळूराम कदम 6 जुलै रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यास गेले असता त्यांना पोलिस निरीक्षक शिंदे यांनी धमकावून दोन ते तीन तास बसवून शिवीगाळ केली.

निवेदन न घेता त्याला हाकलून लावले. सदर पोलीस निरीक्षक लोकसेवकाप्रमाणे न वागता एखाद्या जहागीरदारासारखे वागत असल्याचे म्हंटले आहे. तर वाळू माफिया ढवळे व बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe