मेहेरबाबा ट्रस्ट महार वतनाची जागा बळकावत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  अरणगाव येथील मागासवर्गीय समाज व अवतार मेहेरबाबा ट्रस्ट मध्ये 72 एकर जागेचा वाद निर्माण झाला असताना सदर जागा महार वतनाखाली मिळाली असून, ट्रस्टच्या वतीने बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मागासवर्गीय समाजाला पोलीसांच्या नावाने धमकावले जात असताना या भागातील मागासवर्गीय समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नगर तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी तक्रारदार राजेंद्र कांबळे, गौतम कांबळे, रोहिदास कांबळे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, युवक जिल्हा सचिव मेहेर कांबळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, राहुल कांबळे आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. कांबळे कुटुंबीय अनेक वर्षापासून अरणगाव येथे वास्तव्यास आहे.

महार वतनाची जागा मागील पिढ्यापासून त्यांच्या ताब्यात आहे. मेहेरबाबा ट्रस्टचे पदाधिकारी व विश्‍वस्त सदर 72 एकर जागा बळकाविण्यासाठी पोलीसांच्या नावाने खोटे गुन्हे दाखल करण्यास धमकावत आहे.

तर तलाठी यांना हाताशी धरून सर्वे नंबर 23, 24, 25 जागेचा सर्वे करून, तो गट 27, 37, 27 ब हा आमच्या नावावर न लावता ट्रस्टच्या नावावर लावला असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. ही महार वतनाची जागा अनेक वर्षापासून आमच्या ताब्यात असून, ट्रस्टचा या जागेशी काहीही संबंध नसल्याचे कांबळे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मागासवर्गीयांवर अन्याय होत असून, त्यांना मिळालेल्या महार वतनाच्या जागा बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागासवर्गीयांच्या जमीनी प्रश्‍नी आरपीआयच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केले जाणार. -सुशांत म्हस्के (शहर जिल्हाध्यक्ष, आरपीआय)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe