अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष सुरु होऊनही देशात अनागोंदी व टोलवाटोलवी सुरु असल्याने सर्वसामान्यांची कामे होत नाही.
सर्वसामान्यांना त्यांचे हक्क व न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने इंडिया अगेन्स्ट अनागोंदी आंदोलनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
सर्व सरकारी कामामध्ये अनागोंदी व टोलवाटोलवी सुरु आहे. यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नसून, त्यांची पिळवणुक होत आहे. सरकारी कामात कौशल्य व वेळेचे बंधन नसल्याने अनेक कामांसाठी नागरिकांना ताटकाळात बसावे लागत आहे.
जनता आपल्या हक्काप्रती उदासीन असल्याने ऑब्झर्वर इफेक्ट तंत्र मोडीत निघाले आहे. लोक देश व समाजकार्यासाठी वेळ देऊ शकत नसल्याची शोकांतिका आहे. मत विक्रीतून चुकीचे उमेदवार निवडून येऊन ते आपले घरे भरण्याचे काम करीत आहे.
अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी मध्ये उन्नत चेतनेचा अभाव असल्याने विकास खुंटला आहे. सुपारी घेऊन काम करणार्यांचे पेव फुटले आहे. सुपारी बहाद्दरांच्या दहशतीने जिवाचा दगाफटका होण्याची भिती निर्माण झाली असून, कायद्याचे राज्य मोडीत निघाले आहे.
विज्ञानाची प्रगती झाली, मात्र मानवी प्रवृत्तीमुळे समाजाची अधोगती झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा भ्रष्टाचार मुक्तीचा लढा पुढे चालवण्यासाठी हे आंदोलन चालविण्याचा प्रस्ताव संघटनांच्या वतीने मांडण्यात आला आहे. देशासाठी स्वातंत्र्य मोठ्या कष्टाने मिळाले आहे.
यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली असून, हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी व अनागोंदी थांबवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना स्वातंत्र्यानंतरचा दुसरा लढा उभारणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या आंदोलनासाठी अॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम