अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-पारंपारिक सलून व्यावसायिक व ब्युटी पार्लर व्यवसायिकांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक मदत द्या, किंवा सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने राहाता तालुकाध्यक्ष दशरथ तुपे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे ग्रामविकास तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात नाभिक समाजाचे नेते दशरथ तुपे यांनी म्हटले आहे, की हातावर पोट असलेल्या बहुतेक कामगार, फेरीवाले,
रिक्षाचालक इतर बांधवांबरोबरच नाभिक समाजही कोरोनामुळे अडचणीत सापडलेला आहे. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे गेले वर्षभर आमचा नाभिक समाज बांधव अगदी संकटात सापडला आहे.
आर्थिक समस्यांना कंटाळून मागील काळात आमच्या १६ नाभिक बांधवांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. शासनाकडे वारंवार आर्थिक मदतीची विनंती करूनही, वारंवार निवेदन देऊनही शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही.
शासनाने हातावर पोट असलेल्या बहुतेक व्यावसायिकांना आर्थिक मदत केली, मग आमच्याच व्यवसायावर व बांधवांवर हा अन्याय का? असा सवाल या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
नाभिक समाज नेहमीच आपल्या सरकारच्या आदेशाचे पालन करीत आला आहे.कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण सलून ब्युटी पार्लर व्यवसाय बंद केले;
पण त्या निर्णयामुळे आमचे होणारे नुकसान व नाभिक समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या बाबीचा विचार केला गेला नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.आता पुन्हा लॉकडाऊनमुळे समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतो की आपण आता तरी आमच्या नाभिक समाजाच्या समस्या लक्षात घेऊन नाभिक समाजातील व्यावसायिक बांधवांना व
पार्लर व्यावसायिकांना शासनस्तरावरून आर्थिक मदत द्यावी किंवा सलून पार्लर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तुपे यांनी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|