अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ४९) यांचे अपहरण व हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी दुकानात कामाला असलेल्या नोकरानेच पूर्वनियोजित कट करून पैशांसाठी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातून पाच जणांना अटक केली.
न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हिरण हे सोमवारी (दि. १) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून बेलापूर येथून घरी श्रीरामपूरला दुचाकीवर निघाले होते.
एका मारूती व्हॅनमधून त्यांचे अपहरण करण्यात आले. रविवारी (दि. ७) त्यांचा मृतदेह वाकडी रस्त्यावर यशवंतबाबा चौकीनजीक आढळून आला होता.
अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश खाडे हा हिरण यांच्या बेलापूर येथील दुकानात काही वर्षांपूर्वी नोकरीला होता. हिरण हे दुकान बंद केल्यानंतर घरी पैसे घेऊन जातात.
त्यांच्याकडे १५ ते २० लाख रुपयांची रक्कम असते, याची माहिती त्याला होती. त्यामुळे त्यांचे पैसे लुटण्याचा कट त्याने १५ दिवसांपूर्वीच केला होता.
सोमवारी खाडे हा तिघा साथीदारांसह मारूती व्हॅनमधून (क्र. एमएच १५, जीएल ४३८७) बेलापूरला आले. दोघे साथीदार दुचाकीवर आले; मात्र त्यापूर्वीच हिरण दुकान बंद करून लवकर निघाले होते.
त्यांनी आकाशला हटकले व काय करतो, अशी विचारणा केली. त्यावेळी गाडी बंद पडल्याने त्याने पक्कड मागितली. हिरण यांनी शेजारीच असलेल्या एका गॅरेजमधून पक्कड दिली.
गाडीजवळ हिरण येताच तिघांनी त्यांना बळजबरीने उचलून आत टाकले. त्यांच्या जवळील एक लाख ६५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.
आकाश याला हिरण हे ओळखत असल्याने पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाईल, अशी शंका आल्याने गाडीतच त्यांना मारून टाकले. जुनेद शेख याने त्यांचा गळा दाबला, तर गाडीचे दार आत ओढताना हिरण यांच्या डोक्याला मार बसला होता.
त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मृतदेह औद्योगिक वसाहतीत एका उद्योजकाच्या बंद गोदामात नेला. रात्र झाल्यानंतर मृतदेह यशवंतबाबा चौकीजवळ टाकून पोबारा केला.
परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी ते श्रीरामपूरलाही एकदा येऊन गेले; मात्र एका आरोपीच्या बेसावधपणामुळे या प्रकरणाला वाचा फुटली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|