अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-ब्रिटनच्या युवराज हॅरीने आपल्याला लग्नाचे दिलेले वचन पाळले नसल्यामुळे त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करून अटक करा, अशी हास्यास्पद मागणी एका महिलेने पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात केली होती.
मात्र हा दिवसाढवळ्या स्वप्न बघण्याचा प्रकार असल्याचे नमूद करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.पलविंदर कौर असे याचिकाकत्र्या महिलेचे नाव आहे. पलविंदर स्वत: वकील आहेत.
प्रिन्स हॅरीसोबत आपली सोशल मीडियावर भेट झाली. आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. हॅरीने मला लग्नाचे वचनदेखील दिले होते, असे या महिलेचे म्हणणे होते.
हॅरी लग्नाचे वचन पाळत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. हायकोर्टाने ब्रिटनच्या पोलिसांना हॅरीला अटक करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी पलविंदर यांनी केली होती.
त्यांनी हॅरीसोबतचे सोशल मीडियावरील चॅटिंग, ई-मेल्सदेखील न्यायालयात सादर केले. न्यायमूर्ती अरविंदसिंह संगवान यांनी मात्र ही याचिका फेटाळून लावली. ही याचिका म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न बघण्याचा प्रकार आहे.
याचिकाकर्तीला प्रिन्स हॅरीसोबत लग्न करण्याची इच्छा असून त्यामधून ही याचिका करण्यात आल्याने ती फेटाळण्यात येत आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. हायकोर्टाने याचिका फेटाळताना हा सायबर फसवणुकीचा प्रकार असू शकतो, अशीही शक्यता वर्तवली.
एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर स्वत:ला प्रिन्स हॅरी असल्याचे भासवून याचिकाकर्तीला फसवले असेल. हा तथाकथित प्रिन्स हॅरी पंजाबच्या एखाद्या गावातील असू शकतो. अशा प्रकारे बनावट आयडी वापरून लोक फसवतात.
त्यामुळे न्यायालयाला याचिकाकर्तीबाबत सहानभूती असली तरी ब्रिटनच्या युवराजांच्या अटकेचे आम्ही आदेश देऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|