अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी तथा माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर यांना अटक करून
या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबई इथे संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यांना याबद्दल निवेदन दिले.
शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते ,माजी शहरप्रमुख संभाजी कदम , नगरसेवक बाळासाहेब बोराटे , दत्ता जाधव, श्याम नळकांडे , दीपक खैरे, संग्राम कोतकर आदी उपस्थित होते.
७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची केडगाव इथे अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन वर्षे उलटून गेली तरीही या खटल्याचे प्रोसिडिंग झालेले नाही.
या गुन्ह्यातील काही आरोपींना जामीन देखील मिळालेला आहे. गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झालेले आहे . मात्र गुन्ह्यातील आरोपी सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर तसेच इतर आरोपी फरार आहेत .
फरार आरोपींना तातडीने अटक करून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली असून राऊत यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे .
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|