शहरातील सर्व बँक कर्मचारींचे लसीकरण होण्यासाठी प्राधान्य देण्याचे मनपा आयुक्तांचे आश्‍वासन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकच्या वतीने करण्यात आली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले असून, याची सुरुवात दि.10 मे पासून शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर होणार असल्याची

माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थाक संदीप वालावलकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेतली आहे.

राज्य शासनाच्या 13 एप्रिलच्या ब्रेक द चेन या आदेशान्वये सर्व शासकीय कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन ते सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्था या नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित असल्याने या मधील कर्मचार्‍यांचा शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे जनतेशी संपर्क असतो. सध्या सर्व बँक व पतसंस्थेचे कर्मचारी फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देत आहे.

अनेक बँक कर्मचारींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा यामध्ये जीव देखील गेला आहे. तरी देखील सर्व कर्मचारीची सेवा अविरत सुरु असून, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी त्यांचे लसीकरण करणे अत्यावश्यक असल्याने

काही दिवसांपुर्वी मनपा उपायुक्त डॉ. प्रदिप पठारे यांना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थाक संदीप वालावलकर व सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक अभिनव कुमार यांनी सदर मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली होती.

पुन्हा सदर मागणीसाठी शिष्टमंडळाने आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेतली असता, त्यांनी सर्व बँक कर्मचारींसाठी दि.10 मे पासून (45 ते 60 वयोगट) व 15 मे पासून (18 ते 45 वयोगट) ऑनलाईन नोंदणी करुन सर्व लसीकरण केंद्रावर प्राधान्याने लसीकरण करुन देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

बँक कर्मचारी यांचे लसीकरण होण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांनी केलेला पाठपुरावा व मनपाचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर

तसेच मनपाचे सर्व अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा अग्रणी बँकच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे. या निर्णयाचे सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक अभिनव कुमार यांनी स्वागत केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News