अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना काहीशी गुन्हेगारी कमी झालेली दिसून आली. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ कारणातून झालेले वाद थेट टोकाचा निर्णय घेताना दिसते.
असाच काहीसा प्रकार एका जिल्ह्यात घडला आहे. हॉटेलमधून जेवण न दिल्याने तिघा आरोपींनी हॉटेलमालकास लाकडी दांड्याने मारहाण करत त्याचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल साईसेवा येथे घडला होता.
याप्रकरणी हॉटेलमालक संदीप मंजाबापू टिमकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश दादासाहेब जरे, युवराज भाऊसाहेब साळवे व सागर सोमनाथ टिमकरे (रा.तिघे इमामपूर) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संदीप टिमकरे यांनी त्यांचे हॉटेल दुसऱ्यांना चालवण्यास दिले आहे. २ मे रोजी रात्री तिघा आरोपींनी हॉटेलमध्ये येऊन जेवण देण्याची मागणी केली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने या तिघांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली.
यावेळी कर्मचाऱ्यांनी संदीप टिमकरे यांना बोलावून घेतले. टिमकरे हे आरोपींना समजावून सांगत असतानाच त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांचा गळा दाबला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे पुढील तपास करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|