अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- जिल्ह्यासह देशातील एक प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र असलेले सोनई मधील शनिशिंगणापुर येथे शनिवारी दि. 13 मार्च रोजी असलेली शनिअमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत व प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान कोरोनाचे वाढते संक्रमण आणि त्यातच शनिशिंगणापूर येथील शनिअमावस्या यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने बैठकीचे आयोजन केले. शुक्रवार (दि. 12) रोजी दुपारी तीन वाजता मंदीर बंद करण्यात येणार आहे.
शनिवारी दिवसरात्र दर्शन बंद राहणार आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी गावात जमावबंदीचा आदेश असल्याचे पत्र देवस्थानला दिले आहे.
भाविकांचा गावातील प्रवेश शुक्रवार दुपारनंतर बंद करुन सर्व रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी सांगितले.
यावेळी बैठकीत शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, सरपंच पुष्पा बानकर उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक सचीन बागुल यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाने करोना स्थितीबाबत दिलेल्या आदेशाची माहिती दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|