बळीराजा हवालदिल ; जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडले

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करुनही टोमॅटो विक्रीला नेल्यानंतर वाहनखर्चही निघेनासा झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात हाती येऊ लागले असून, बाजारात आवकही वाढली आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या टोमॅटोला पाच ते सहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱयांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव भागातील शेतकऱयांना याचा अधिक फटका बसत आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, पारनेरसह काही भागात टोमॅटोचे मोठे उत्पादन घेतले जाते. जिल्हाभरात साधारण 8 ते 10 हजार हेक्टरवर टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. सध्या टोमॅटोचे पीक जोमात आहे. संगमनेर, अकोले, नगरसह सर्वच बाजार समित्यांत दिवसाला सुमारे एक हजार टन टोमॅटोची आवक होत आहे. जिल्ह्यातून पुणे, मुंबई, गुजरात व अन्य भागात टोमॅटो विक्रीस नेला जातो. मात्र, मागणी नसल्यामुळे दर पडले आहेत. टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

टोमॅटोच्या एका एकरासाठी एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र, दर पाहता विक्रीतून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे टोमॅटो तोडणी करून बाजारात नेण्यास परवडत नसल्याने काही ठिकाणी शेतकऱयांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला आहे. शेतकरी व्यवस्थेविरोधात रोष व्यक्त करत आहे. मर-मर मरून उत्पादित केलेल्या शेतीमालाला जर कवडीमोल दराने किंवा शून्य रुपये दर मिळत असेल तर शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe