जिल्ह्यातील ‘ या’ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन संपन्न, अकरा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी पाठपुरावा केला होता.

परंतु २०१४ ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याबाबत विद्यमान शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मात्र २०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच आमदार आशुतोष काळे यांनी सदर प्रस्तावाचा पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे अकरा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असून भविष्यात गरज भासल्यास या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करू असे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील अकरा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या माहेगाव देशमुख येथील ५ कोटीच्या प्राथमिक केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन व २४ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सुदाम पानगव्हाणे घर (गणपती मंदिर) ते संजय रणशिंग शेती रस्ता व रामभाऊ काळे घर ते भारत काकड घर (मळेगाव थडी हद्द) रस्ता डांबरीकरण कामाचे भूमीपूजन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी आमदार किती काम करू शकतो याला मर्यादा नाही आणि मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणायला देखील मर्यादा नाही मात्र गरज असते ती विकासकामे करण्याच्या इच्छाशक्तीची. हे मी स्वत: अनुभवत असून त्यामुळे मतदार संघासाठी प्रतिकूल परिस्थितीत कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविला आहे.

माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील त्यांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या सबंधातून कोपरगाव तालुक्याच्या विकासाचा अनुशेष २००४ ते २०१४ या दहा वर्षात भरून काढला. सत्तेचा उपयोग हा जनसामान्यांच्या हितासाठीच करून प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र मधील काळात झालेल्या दुर्लक्षामुळे मंजुरी मिळाली नाही.

जनतेने सेवा करण्याची संधी दिली व जनतेच्याच आशीर्वादाने सताधारी पक्षाचा आमदार झालो. मात्र दुर्दैवाने २०१९ पासून संपूर्ण विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असतांना प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. आरोग्य सुविधांबरोबरच पाणी, रस्ते आणि वीज हे प्रश्न देखील महत्वाचे असून त्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.

सध्याची आरोग्य परिस्थिती पाहता भविष्यात गरज वाटल्यास या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माहेगाव देशमुख येथे होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील अकरा गावातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला असून या गावातील सरपंच, उपसरपंच यांनी यावेळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.

यावेळी कारभारी आगवन, राजेश परजणे, सुधाकर दंडवते, अर्जुनराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक माहेगाव सोसायटीचे चेअरमन रविंद्र काळे यांनी केले तर आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी मानले. यावेळी सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, संभाजीराव काळे, जी.प. सदस्य राजेश परजणे, सुधाकरराव दंडवते, कारभारी आगवन,

पं.स. सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, मधुकर टेके, रोहिदास होन, दिलीपराव दाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, पंचायत समितीचे उपविभागीय अभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता राजेंद्र दिघे, दिलीप गाडे माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन,संचालक, डॉक्टर्स, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe