राष्ट्रवादीच्या ‘ या’ आमदारांचा भाजपकडून सन्मान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोना महामारीत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांसाठी केलेल्या विविध उपाययोजना करून योग्य व्यवस्था निर्माण केली.

आरोग्य विभाग व प्रशासनाला वेळोवेळी आवश्यक असणारी मदत करून सातत्याने काय हवं नको याची नेहमीच विचारपूस करून सदैव प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कोपरगाव तालुक्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणल्याबद्दल त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांची भेट घेवून त्यांचा गौरव करून आभार मानले आहे.

यावेळी बोलतांना भाजपाचे विनायक गायकवाड म्हणाले की, कोविडच्या अदृश्य विषाणूने मागील वर्षापासून सर्वत्र धुमाकूळ घालत लाखो नागरिकांचे प्राण घेतले आहे. यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेच्या रुद्र रूपामुळे तर प्रत्येक नागरिक भयभीत झाला होता.

कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली होती तर काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. मात्र अशा परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून आदर्शवत व्यवस्था उभी केल्यामुळे निश्चितपणे कोरोना संसर्गाला आळा बसण्यात मदत झाली.

५०० बेडचे कोविड केअर सेंटर, १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर तसेच ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे आयसीयू डेडीकेटेड कोविड केअर सेंटर,ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन प्लँट ची उभारणी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात ऑक्सिजन प्लँट ची उभारणी उभारणी करण्याच्या निर्णयातून त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी अधोरेखित होत आहे.

भाजपाचे योगेश वाणी म्हणाले की, मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत आहे. हि तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब असून आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांनी केलेले काम अजोड आहे.

त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कोपरगाव विधासभा मतदार संघातील एक जागरूक नागरिक या नात्याने आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनी तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करीत असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, विश्वस्त मन्नूशेठ कृष्णानी, योगेश वाणी, विनायक गायकवाड, घोडके सर, सुरेश कागुणे, राजेंद्र खैरे, किरण वडणेरे, प्रशांत झावरे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe