भाजप फुटीच्या उंबरठ्यावर!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- पश्चिम बंगालमधील आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी भाजपचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे राज्यपाल जगदीप धनखड यांना भेटले आहेत; परंतु यावेळी पक्षाच्या सुमारे २४ अमदारांनी दांडी मारली आहे.

त्यामुळे राज्यातील भाजपमध्ये फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे. हे २४ आमदार भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अटकळींचे पेव फुटले आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला २९४ पैकी ७२ जागा जिंकण्यात मोठे यश आले आहे.

त्यानंतर राज्यात मोठा हिंसाचार घडला. काही अनपेक्षित घटनासुद्धा घडल्या आहेत. त्याची माहिती राज्यपालांना देण्यासाठी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाले. यावेळी २४ आमदारांनी दांडी मारली.

हे सर्व जण सुवेंदू अधिकारी यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना सुवेंदू यांचे नेतृत्व मान्य नसल्याचेही बोलले जात आहे. भाजपचे अनेक आमदार हे पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छुक आहेत. ते तृणमुलच्या संपर्कात आहेत. म्हणूनच भाजपमध्ये लवकरच उभी फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.

उल्लेखनीय बाब अशी की, गेल्याच आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय हे तृणमूलमध्ये परतले आहेत. आता राजीव बॅनर्जी, दीपेंदू विश्वास आणि सुभ्रांशू रॉय यांच्यासह अनेक नेते पुन्हा स्वगृही परतण्याचा कयास लावला जात आहे.

दरम्यान, मुकुल रॉय यांच्यासोबतचे जवळपास ३० आमदार पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छुक आहेत, असा दावा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe