शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेला डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे प्रतिक आहे. ‘मेक ईन इंडिया’ च्या माध्यमातून संरक्षण सामुग्री देशातच निर्माण करण्याच्या दृष्टीने शेल फोर्जींगचा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असून, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी या माध्यमातून निर्माण होतील असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
सावळीविहीर खुर्द येथे शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टर अंतर्गत कोल्हारचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड अर्थात शेल फोर्जींग प्रकल्पाचे भूमीपुजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी आ.आशुतोष काळे, डॉ.सुजय विखे पाटील, कंपनीचे चेअरमन गणेश शिबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेल्या डिफेन्स क्लस्टरमुळे जिल्ह्याचे औद्योगिक पर्व सुरु होत आहे. विधानसभेच्या निवडणूकी पुर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता आज होत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरु होत असतानाच शिर्डी विमानतळावर नाईट लॅन्डींगची व्यवस्थाही सुरु होणे हा मोठा योगायोग असून,
शिर्डीतील औद्योगिक विकासाला या सर्व पायाभूत सुविधांची मोठी मदत होईल. औद्योगिक वसाहतीला ५०० एकर जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे मोठा प्रकल्प आता कार्यान्वित होत असून, याबरोबराच आता टाटा कंपनीच्या पुढाकाराने अडीचशे कोटी रुपये गुंतवणूकीतून प्रशिक्षण केंद्रही कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून गणेश निबे यांनी संरक्षण व्यवस्थेसाठी लागणा-या सर्व साधन सामुग्रींची निर्मिती सुरु केली आहे. यापुर्वी संरक्षण साहित्य मोठ्या प्रमाणात आयात करावे लागत होते. मात्र आता पंतप्रधान मोदीजींनी मेक ईन इंडिया योजनेतून संरक्षण साहित्य देशामध्येच निर्माण करण्यावर दिलेला भर पाहाता शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टर हे महत्वपूर्ण ठरणार असून, यामुळे जिल्ह्याचा गौरव होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुमारे ३५ लाख चौरस मिटर कार्यक्षेत्रात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून, पुढील पाच वर्षात सहा लाख शेल फोर्जींगची निर्मिती या ठिकाणी होणार असून, सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या ऑर्डरची नोंदणी झाली असून, सुमारे दोन हजार युवकांना यातून रोजगार मिळणार असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
अगामी काळात होणारा कुंभमेळा पाहाता शिर्डी शहराच्या विस्तारीकरणाच्या कामास प्रारंभ करावा लागणार असून, शिर्डी शहरातील थिमपार्कला २२ कोटी आणि अकरा चारीच्या रस्त्याकरीता ४० कोटी रुपये शिर्डी संस्थानने मंजुर केले असून, शहराच्या सौदर्यकरणासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात कोपरगावच्या औद्योगिक विकासालाही गती मिळावी म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्या खाली असलेली वळू प्रकल्पाची जागा ही औद्योगिकरणासाठी मिळावी अशी मागणी करुन, मंत्री विखे पाटील यांनी याबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी अशी मागणी केली.
प्रकल्पाचे चेअरमन गणेश निबे यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाची माहीती देतानाच भविष्यात आणखी दोन प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ लवकरच संपन्न होणार असून, शेल फोर्जींग मध्ये भरली जाणारी डस्ट या ठिकाणावरुनच भरण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मंत्री विखे पाटील यांचा पाठपुरावा सातत्याने राहील्यामुळेच या प्रकल्पाला मुर्त स्वरुप आले असल्याचे त्यांनी सांगितले.