सोशल मीडियावर मित्र असलेल्या भामट्याने तरुणाला फॉर्च्यूनर गाडी विक्री करून नऊ लाख रुपये घेतले. नंतर नावावर करून देतो म्हणत टाळाटाळ सुरू केली. दरम्यान कुटुंबियांसह सातारा येथे फिरायला गेलेल्या तरुणाकडील फॉर्म्युनर गाडी बँकेच्या वसुली पथकाने अर्ध्या रस्त्यात उतरून जप्त केली. अनुराग हरिश्चंद्र तिवारी (३३, रा. डायमंड पार्क, वाकड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
यशोदीप अशोक चौधरी याची आरोपी अनुराग याच्याशी सोशल मीडियावर २०१८ मध्ये ओळख झाली. एप्रिल २०२१ मध्ये त्याने आई शैला हरिशचंद्र तिवारी यांच्या नावावर असलेली फॉर्च्यूनर गाडी (एमएच-१४- ईएच – ३०७०) विकायची असे सांगितले.
२९ एप्रिल २०२१ रोजी अनुराग फॉर्च्यूनर घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे आला. दोघांमध्ये १३ लाख ८० हजारांत व्यवहार ठरला. त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा न्यायालय येथे खरेदीखत केले. अॅक्सिस बँकेच्या पुणे शाखेतील तिवारी याच्या खात्यावर दोन वेगवेगळ्या बँक खात्यावरुन २ लाख रुपये पाठविले. तसेच २ लाख रुपये रोखीने असे एकूण ९ लाख रुपये अनुराग तिवारीला दिले.
यशोदीपने गाडीला नवीन टायर व सर्व्हिसिंग म्हणून १ लाख रुपये खर्च केले. उरलेले ४ लाख ८० हजार रुपये गाडी नावावर करुन घेतल्यावर देण्याचे आपसात ठरले. परंतू, नंतर अनुरागने गाडीचे कागदपत्रे व गाडी नावावर करुन देण्यास टाळाटाळ सुरू केली. कधी आई तर कधी वडील बाहेर राज्यात असल्याचे कारणे त्याने सांगितली.
२५ डिसेंबर २०२१ रोजी रात्री यशोदिप कुटुंबासह महाबळेश्वर येथून परत येत असताना कुणाल चव्हाण याने सातारा येथे गाडी थांबवली व रिकव्हरी एजंट असल्याचे सांगून गाडीवर कंपनीचे लोन असल्याचे सांगत गाडी जप्त करून घेतली.
त्यामुळे यशोदीपने शहरात परतल्यानंतर अनुराग तिवारीला संपर्क केला असता त्याने बँकेशी काही संबंध नाही, गाडीवर कोणतेही लोन नाही असे म्हणत त्यांने वसुली एजंटला फोनवर शिवीगाळ केली.
त्यामुळे यशोदीपने त्याला एजंटविरुद्ध तक्रार देण्यास सांगितले. मात्र, त्याने तक्रार केली नाही. उलट यशोदीपने पैसे परत मागितले असता अनुराग तिवारी तुम्ही माझे काही बिघडू शकत नाही तुला काय करायचे ते करुन घे. असे म्हणत धमकावले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.