सरकारी कार्यालयात घुसून ग्रामसेवकाला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असलेले ग्रामसेवक महादेव सखाराम माने यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान ग्रामसेवक महादेव माने यांना मारहाण करणार्‍या आरोपीस पोलिसांनी तातडीने जेरबंद केले आहे. ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव संजय मद्रास काळे (रा. निमगाव डाकू) असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामसेवक माने हे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करत असताना संजय काळे दारूच्या नशेत तेथे आला.

‘माझ्या आईच्या नावावरील आमचे घराचा मला उतारा काढून द्या अशी मागणी केली व उतारा आत्ताच्या आत्ता आणि लगेच माझ्या हातामध्ये पाहिजे’ असे ओरडत म्हणाला.

त्यावर माने यांनी ‘रजिस्टरला नाव पाहून तुमचा उतारा काढून देतो’ असे समजावून सांगत असतानाच काळे याने शिवीगाळ करत माने यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

कार्यालयीन खुर्च्यांची मोडतोड केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.