अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- केरळमधून दोनच दिवसांत मोसमी पाऊस कोकणमार्गे राज्यात दाखल झाला होता. सध्या त्याने थेट काश्मीरपर्यंत धडक दिली.
सुरुवातीला जोरदार बरसलेला पाऊस मात्र गेल्या काही दिवसांपासून गायब झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता उभी राहिली आहे. ९ जूनला संपूर्ण कोकणसह मुंबई परिसर ओलांडणाऱ्या मोसमी पावसाने हाहाकार उडवून दिला होता.
याच कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातून तो गायब झाला आहे. सध्या खरिपाच्या पेरण्यांचा हंगाम सुरू आहे.
अनेक भागांत पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस झाला असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, तीन ते चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी पावसाळी स्थितीमुळे राज्यात सर्वच ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. ते आता पुन्हा ३० अंशांपुढे जाऊन अनेक भागांत उन्हाचा चटका जाणवू लागला.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, मराठवाडय़ातील उस्मानाबाद, विदर्भातील अकोला आदी जिल्ह्य़ांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. सहारा भागातून हवेच्या वरच्या भागात येणाऱ्या धूलिकणांमुळे ढगांची निर्मिती होत नाही.
ढगांची निर्मिती झाली तरी त्यांची वाढ होत नाही. त्यामुळे ते पाऊस देत नाहीत. ही स्थिती सध्या निर्माण झाली आहे. परिणामी पाऊस कमी किंवा गायब झाला आहे.
२० ते २१ जूनपर्यंत प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम