कोविड लसीकरणावेळी आरोग्य कर्मचार्‍यांकडून ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  राज्य शासनाने कोविड 19 या महामारीची लस ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचा आजार असणार्‍यांसाठी मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे.

याचाच एक भाग म्हणून येथील देवळाली प्रवरा जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात काल सकाळी 11 वाजता लसीकरणासाठी नाव नोंदणी करुन सुरुवात करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी करोनाच्या मोफत लसीकरणाचे आयोजन केले होते.

मात्र, आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे लसीकरणाचा पुरता फज्जा उडाला. लसीकरणातच आरोग्य कर्मचार्‍यांचा गोंधळ उडालयाने नागरिकांचा या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद लाभला.

मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, उर्मट आरोग्य कर्मचार्‍यांमुळे ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

लसीकरण… नोंदणी… उडाला गोंधळ :- लसीकरणासाठी स्वतःच्या मोबाईलवरून शासनाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. हा मोबाईल नंबर आधारकार्ड सोबत जोडलेला असावा. नोंदणी केल्यानंतर या स्थळावरुन एक ओटीपी नंबर येईल.

तो नंबर दिल्यानंतर व संबंंधित नागरिकाचा रक्तदाब तपासल्यानंतर लसीकरण करण्यात येईल, अशा सूचना उपस्थित वैद्यकीय पथकाने नागरिकांना दिल्यानंतर नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून संकेतस्थळावर संपर्क साधला. परंतु दोन तास होऊनही ओटीपी न आल्याने कंटाळून नागरिक निघून गेले. यावेळी आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार मात्र, बघण्यास मिळाला.

उर्मट कर्मचारी… :- आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाकडून रूग्णांची हेळसांड करण्यात येते. गोरगरीब रूग्णांकडून केसपेपर काढण्यासाठी पाच रुपये घेण्याऐवजी जादा रक्कम आकारली जाते.

महिला कर्मचारीही रूग्णांना अरेरावी करून प्रसंगी तेथून औषधोपचाराविना काढून देत असल्याचे त्रस्त रूग्णांनी सांगितले. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी संतप्त रूग्णांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe