जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यानुसार शुक्रवार दि.१८ रोजी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगरसह  खानदेश, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसासह  काही प्रमाणात गारपिटीची शक्यता आहे .

विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हिवाळ्यामुळे आधीच वातावरण थंड आहे त्यात पाऊस पडल्याने वातावरणात आणखी गारवा पसरला आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडे राहिल.

यामुळे नागरिकांसह त्या -त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे.

तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, पत्र्याच्या   शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe