अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व आंतरराष्ट्रीय बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय २५) यांच्यावर कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडल्या.
यात चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी लगेचच पसार झाले. मंगळवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता चव्हाण घोडेगावातून घरी चालले होते. कांगोणी फाटा ते बऱ्हाणपूर रस्त्यावर आपले वाहन थांबून लघुशंका करत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी चव्हाण यांच्यावर गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडल्या.

यात ते गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर आरोपी पळून गेले. भानुदास जगन्नाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन बाळासाहेब भाऊसाहेब हापसे व विजय विलास भारशंकर (दोघे राहणार बऱ्हाणपूर) यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर ६९/२०२१नुसार, भा.दं.वि. कलम ३०७, ३४, आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेका घेणे अथवा जुन्या काहीतरी वादातून हा गोळीबार झाला असावा. निश्चित कारण समजले नाही, असे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी रात्रीपासूनच आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले.
एलसीबीचे पथकही आरोपीचा शोध घेत असल्याचे समजते. गोळीबाराच्या घटनेने परीसर हादरला आहे. चव्हाण यांच्या पाठीखाली, खांद्यावर व कंबरेच्या खाली सर्व चार गोळ्या लागल्या असून नगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून सर्व गोळ्या काढण्यात आल्याचे समजते.
घटनेनंतर काही वेळातच शनिशिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल व पथक घटनास्थळी पोहचले. शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम