अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- काळानुसार चोऱ्या करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी दरोडा टाकणे, चोरीसाठी खून करणे, अशा प्रकारचे गुन्हे होत होते. आता सायबर डल्ला टाकला जातो.
यामध्ये कोणाच्याही जीविताला धोका होत नाही. सायबर गुन्हेगार समोरासमोर येत नाहीत. तरीसुद्धा बँक खात्यातून लाखो रुपये हडप करतात. या कारनाम्यासाठी सोशलमिडीयाचा मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदी काही क्लिकवर बँक अकाउंट साफ केले जाते.
फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल साईट हॅक ही लूट होते आहे. त्यामुळे सायबर डाका हा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. सायबर पोलिसांनी तीन वर्षात एक कोटी ६६ लाख ३८ हजार १९२ रुपयांची रिकव्हरी केली आहे.
सायबर गुन्ह्याला प्रसिद्धी देऊन अनेकवेळा जण जागृतीचे कामही सायबर पोलिसांकडून केले जाते. असे गुन्हे करण्यासाठी प्रथम गुन्हेगार खातेधारकांचे सोशल मीडिया अकाऊन्ट क्लोन केले जाते.
मोबाईलवर संपर्क साधून तुमच्या क्रेडिटकार्डची मर्यादा वाढवून दिली जाणार आहे, असे भासवून क्रेडिटकार्ड नंबर आणि पासवर्ड, ओटीपी विचारून पैसे हडपले जात होते. विविध नामांकित फायनान्सचे नाव सांगून कर्ज कमी व्याजाने देण्याचे आमिष दाखविले जाते.
कर्ज प्रकरणाच्या प्रक्रियेसाठी सुरूवातीस कमी रक्कम आकारली जाते. त्यानंतर मुद्रांक शुल्क, विमा आणि कर्जाच्या पहिल्या हप्त्यापोटी रक्कम घेतली जाते. या प्रकारात २० ते २५ हजार रुपयांना फसविले जाते. त्यानंतर संबंधित मोबाईल बंद केला जातो.
बॅंकेच्या ज्या खात्यात पैसे भरलेले असतात, ते काढून सायबर गुन्हेगार फरार होतात. सोशल मीडियातील अकाउंट क्लोन करुन सर्व मित्र परिवार आणि नातेवाईक तसेच फेसबुकशी संबंधित असलेल्या सर्वांना वैद्यकीय कारणास्तव पैशाची गरज असल्याचा मेसेज पाठविला जातो. अशा प्रकारच्या तक्रारी जिल्ह्यात सर्वाधिक आहेत.
हे आहेत सायबर योद्धे – जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि उपनिरीक्षक प्रतीक कोळी या दोन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गुंडू, अभिजित आरकल, अरूण सांगळे,
भगवान कोंडा, गणेश पाटील, योगेश गोसावी, मलिकाअर्जुन बनकर, दिगबंर कारखिले, उमेश खेडकर, राहुल हुसळे, सम्राट गायकवाड, सविता खताळ, पूजा भांगरे, उर्मिला चेके आदी १८ कर्मचारी सायबर गुन्हेगारांच्या विरोधात कार्यरत आहेत.
अकाउंट मधून पैसे चोरी गेल्यास तात्काळ काय करावे – क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, कर्ज, शोरूमच्या आमिषाने फसवणूक प्रक्रियेत सायबर गुन्हेगारांकडून संबंधित खाते बंद होण्याच्या आत तक्रार सायबर पोलिसांकडे द्यावी. यामुळे गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करणे शक्य होते.
तसेच सायबर गुन्ह्याची उकल होण्यास मदत होते. पोलिसांनी २०१९ मध्ये एक कोटी ४१ लाख ३६ हजार ९५९ रुपये वसूल केले. २०२०मध्ये ५१ लाख २७ हजार ५७५ रुपये तर २०२१ मध्ये ७२ लाख ९८ हजार ६२३ रुपये मिळवून देण्यात सायबरला यश आले.
अनोळखीशी व्यवहार नको – शोरूम देणे, जादा पैशांचा परतावा, मोबाईल टॉवर देणे असे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करू नका.
कर्ज देणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नका. कोणाला ही आपल्या एटीएमचा नंबर, पासवर्ड, ओटीपी देऊन नका. काही ॲप, लिंक डाऊनलोड केल्यास सर्व माहिती सायबर गुन्हेगारांना प्राप्त होते. ॲप, लिंक डाऊनलोड करू नका, असे आवाहन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम