अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आज राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाथर्डी तालुक्यात मात्र अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
नुकताच येथील आठवडा बाजार झाला. बाजारात झालेल्या गर्दीतील माणसांकडुन कोवीडच्या नियमांचे उल्लंघन झाले. मात्र पालिका प्रशासनाची पथके बाजारात दिसली नाहीत. बाजाराची वसुली पालिका करते मग जबाबदारी पालिकेची, असे समजुन महसुल विभागाचे पथकही तिकडे फिरकलेच नाही.
कोवीडच्या प्रसाराला सर्वाधिक संधी भाजीबाजारातुन आहे. ग्रामिण भागातील लोक येथे जमा झालेले असतात. मास्क नसणे व सोशल डिस्टन्स न पाळणे, याबाबत कोणीही कारवाई केली नाही. पाथर्डीत आठवडा बाजाराचा बुधवार दिवस असतो. बाजारात व्यापारी, शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
सुमारे पन्नास टक्के माणसांनी मास्क लावलेले होते व तितकेच लोक विनामास्कचे होते. पैशाची देवान-घेवाण व भाजीपाला खरेदी करताना थेट संपर्क येत असल्याने कोवीडचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. पालिकेने दोन पथके नेमली आहेत. पण भाजीपाला बाजारात पथकातील व्यक्ती कुठेही दिसल्या नाहीत.
महसुल विभागाचे पथकही बाजाराकडे फिरकले नाही. त्यामुळे आठवडा बाजार बंद करण्याची मागणी काही नागरीकांनी केली आहे. बाजारात नियम पाळणे महत्वाचे असताना तसे घडले नाही. त्यामुळे पुढील काळात जर कोरोनाचा उद्रेक झाला तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|