दुषित पाण्याने नागरिक आजारी !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझीनगर भागात दुषित पाण्याने नागरिक आजारी पडले असून, नियमित व शुध्द पाणीपुरवठा करुन ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन प्रभागातील नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांनी मनपा आयुक्तांना दिले.

काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांना नळाद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या या भागात अनियमीत पाणीपुरवठा सुरु असल्याने, सर्वसामान्य नागरिकांना नाईलाजाने दुषित पाणी पिण्यात येत आहे.

यामुळे सदर भागातील अनेक नागरिक आजारी पडले असून, त्यांना उलट्या व जुलाबचा त्रास सुरु झाला आहे. घरोघरी आजारी रुग्ण आढळू लागले आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे मैलमिश्रीत पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.

महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबली असून, ड्रेनेजच्या घाण पाण्याचे डबके साचले आहे. नागरिक कोरोनापासून बचाव करीत असले, तरी महापालिकेच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांना दुषित पाण्याच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. ड्रेनेजलाईन दुरुस्त करण्यासाठी मनपा कर्मचारी येऊन गेले.

मात्र मैलमिश्रीत पाणी उपसा करणार्‍या गाडीचा जेट दुरुस्त नसल्याचे कारण पुढे करुन वेळ मारुन नेण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझीनगर भागात दुषित पाण्याने नागरिक आजारी पडले असताना, या प्रश्‍नाची दखल घेऊन या भागात नियमित व शुध्द पाणीपुरवठा करुन ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांनी केली आहे.

निवेदनावर शाहीन शेख, अय्युब पठाण, मनिषा शिंदे, फातेमा सय्यद, रेशमा बागवान, आशा शिंदे, नसरीन बागवान, इमरान इनामदार, हामजा शेख, समिना शेख, हाजराबी शेख, आशा गायकवाड, खलिल शेख, रिजवाना बागवान, नजीर पठाण, लक्ष्मी पाचरणे आदींसह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर