वाढत्या कोराेना संक्रमणामुळे नागरिक त्रस्त !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  पारनेर तालुक्यात काेरोना संसर्गाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतानाही तालुक्यातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १३६ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. यातील ५६ करोना बाधित निघोज येथील आहेत.नगर शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत ही रुग्ण संख्या मोठी आहे.

वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २१ गावांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार तीन दिवसांपूर्वी बंद केले आहेत. २१ गावांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी तर ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू केली आहे.

इतर गावांमध्येही निर्बंध लागू केले आहेत. लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधी, दशक्रिया विधींसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधन पाळले जात नाही. तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील विविध मंगल कार्यालयांना भेटी दिल्या.

गणपती फाटा (पारनेर) तसेच वाडेगव्हाण येथील विवाह समारंभासाठी ३०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असल्याने दोन्ही कार्यालयांच्या मालकांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

लग्न अथवा इतर समारंभामध्ये उपस्थितीच्या मर्यादेचे उल्लंघन करणारांना दंड करता येईल, गुन्हे दाखल करता येतील मात्र अंत्यविधी, दशक्रिया विधीला लोकांनी गर्दी केली, तर काय कारवाई करणार.आम्हीही माणसेच आहोत.

तुम्ही काळजी घ्या, असे भावनिक आवाहन पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी नागरिकांना केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe