अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- मातीमिश्रीत वाळूचा लिलाव तात्काळ बंद करावा. या मागणीसाठी आरपीआय व वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान हा लिलाव तात्काळ बंद केला नाही तर संबंधित ठिकाणी जाऊन लिलाव बंद पाडू, असा इशारा आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी दिला आहे.
याबाबत साळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे सुरू असलेला माती मिश्रीत वाळूचा लिलाव महसूल प्रशासनाने दिलेल्या नियम, अटी व शर्तीचा भंग करून सुरू आहे.
त्याठिकाणी महसूल प्रशासनाने दिलेल्या अटीप्रमाणे एका गाडीत दोन ब्रास वाळू उचलण्याची परवानगी असताना त्या ठिकाणाहून ओव्हरलोड व्होल्वा गाडीद्वारे सहा ते सात ब्रास वाळूची वाहतूक सुरू आहे.
तसेच त्या ठिकाणाहून 200 ते 300 गाड्यांद्वारे वाळू वाहतूक चालू आहे. प्रशासनाने त्यांना दिलेल्या 300 ब्रासची क्षमता त्यांनी केव्हाच ओलांडली आहे. आणि अनधिकृतपणे जास्तीची वाहतूक सुरू आहे.
त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. लिलावाची चौकशी करून मोजमाप करून तात्काळ लिलाव बंद करावा. अन्यथा लिलाव सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन लिलाव बंद पाडू, असा इशारा साळवे यांनी दिला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|