आ. संग्राम जगताप यांनी आयटीपार्कच्या नावाखाली तरुणाईला गंडा घालत फसवणूक केली

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. संग्राम जगताप यांनी आयटी पार्कच्या नावाखाली मोठा ढोल बडवत नगर शहराला हैदराबाद, पुणे, बंगलोरच्या धर्तीवर आयटी हब करणार असा कांगावा करत तीन हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणींच्या मुलाखती आपल्या स्वतःच्या आयुर्वेद येथील खाजगी कार्यालयात घेतल्या. यातील अनेकांना नोकऱ्या पण दिल्या.

पण आता ज्यांना नोकऱ्या दिल्या त्यांचे कोट्यवधी रुपयांचे पगार बुडवून त्यांना हाकलून देत आ.जगताप यांनी आयटीपार्कच्या नावाखाली नगर शहरातील तरूणाई, त्यांचे पालक यांच्या भावनांशी खेळत त्यांना गंडा घालत फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.* नुकताच उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा एमआयडीसी मध्ये आ. जगताप यांच्या पुढाकारातून दौरा झाला होता. यावेळी उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावणार असे जगताप यांनी म्हटले होते.

त्याआधीच जुलै महिन्यामध्ये किरण काळे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये एमआयडीसीतील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. ना.तटकरे यांच्या नगर दौ-या पूर्वीच मागील बुधवारी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत ना. बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात बैठक करत उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावल्याची माहिती ना. थोरात यांनी संबंधित खात्यांचे विविध मंत्री, अधिकारी यांच्याशी जुलै महिन्यामध्ये केलेल्या पत्रव्यवहाराच्या पुराव्यानिशी किरण काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.

त्यानंतर आता काळे यांनी जगताप यांची आयटी पार्कच्या मुद्द्यावरून पोलखोल करीत गंभीर आरोप केल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसने आयटी पार्कमध्ये प्रत्यक्ष पाहणी करत आयटी पार्कच्या वास्तवाची पोलखोल केली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये आ.जगताप यांनी आयटी पार्क सुरू केला होता. त्याला आता दोन वर्ष झाली आहेत. कोरोना संकट काळामध्ये जगातील अनेक व्यवसाय बुडीत निघाले.

मात्र आयटी क्षेत्र हे याला अपवाद होते. कोरोना काळात सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून का होईना पण आयटीमध्ये कुणाच्याही नोकऱ्या गेल्या नाहीत. कोरोना काळातच फेब्रुवारी २०२१ मध्ये स्वतः जगताप यांनीच आयटी पार्कमध्ये मोठा कार्यक्रम करत कोरोना असून देखील आम्ही आयटी पार्क मध्ये तरुणांना नोकऱ्या दिल्या आणि देशभरातील अनेक कंपन्या इथे आम्हाला जागा मागत आहेत असे नगरकरांना जाहीरपणे सांगितले होते.

किरण काळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यां समवेत आयटी पार्कची आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी फक्त एका फायनान्स कंपनीच्या वसुलीसाठी कॉल सेंटर म्हणून काम करणारी बिपिओ कंपनी, सहा- सात लोकं काम करणारी ईआरपी डेवलपमेंट कंपनी आढळून आली. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणतीही आयटी कंपनी आढळून आली नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

काळे यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला असता यामध्ये एकही सॉफ्टवेअर इंजिनियर सापडला नाही. तसेच बारावी पास मुले टेली कॉलिंगचे काम करताना आढळून आली. या ठिकाणी आयटी कंपन्यां ऐवजी लॉजिस्टिक कंपन्या, ट्रेडिंग कंपन्या तसेच लेबर कॉन्ट्रॅक्टर ऑफिसेस थाटलेली आहेत. याठिकाणी सिगरेटची पाकिटे, देशी दारूच्या बाटल्या आणि प्रचंड घाण काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पाहायला मिळाली.

पाहणीनंतर किरण काळे म्हणाले की, आयटी पार्कचे वास्तव हे धक्कादायक आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर शहरातल्या तरुणाईला मतदाना पुरते आकर्षित करण्यासाठी आयटी पार्कचे ढोंग जगताप यांनी रचले होते. आयटी पार्क मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सात ते आठ राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय कंपन्या मी आणल्या असून अडीचशे तरुणांना रोजगार दिला आहे असे तात्पुरते नाटक उभे केले गेले.

आयटी पार्क मधीलच काही युवक, युवती तसेच त्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थित स्वतःचा उमेदवारी अर्ज देखील विधानसभेला त्यांनी भरला. आयटी पार्कच्या इमारतीची रंगरंगोटी, डागडुजी केली. पहिल्या टप्प्यात अडीचशे युवकांना मी नोकरी दिली असून डिसेंबर २०१९ पर्यंत एक हजार मुलांना याठिकाणी नोकरी देणार असल्याची बतावणी जगताप यांनी केली होती. पत्रकार परिषदा घेऊन नगर शहरातील तरुणांची दिशाभूल केली.

मात्र ज्यावेळी काँग्रेसच्या टीमने आयटी पार्कची मागील चार दिवसांपासून प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली, वास्तवाचा सखोल अभ्यास केला त्यावेळी भयाण असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या ठिकाणी आयटी कंपन्याच नसून आयटी कंपन्यांनी इथे काम करणाऱ्या भाबड्या तरुणाईचे केवळ एक, दोन महिन्यांचे पगार देत त्यांचे लाखो, कोट्यवधी रुपयांचे पगार बुडवत त्यांना हाकलवून लावले आहे.

या तरुणांनी अनेक वेळा जगतापांच्या आयुर्वेद कार्यालयावर पगारासाठी खेटा घातल्या. काहींनी तर सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन देखील पगार मिळतो का यासाठी दारे ठोठावली. मात्र त्यांना जगताप आणि त्यांच्या टोळ्यां कडून दमबाजी करण्यात आली. त्यांच्या घामाचा पैसा आ. जगताप यांनी लाटला, असा घणाघाती आरोप काळे यांनी केला आहे. काळे म्हणाले की, मुळात आयटी पार्कच्या नावाखाली याठिकाणी कोणत्याही कोअर आयटी कंपन्या यांनी आणल्याच नव्हत्या.

ज्या कंपन्या उभ्या केल्या गेल्या त्या यांच्याच बगल बाच्यांच्या होत्या. यांच्या आयुर्वेद कार्यालया मध्ये बसून तयार केलेल्या कंपन्यांना यांनी थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दर्जा स्वतःच घोषित करून टाकला होता. निवडणुकीसाठी नाटक करण्याचा त्यांचा पूर्वनियोजित कट होता. एखाद्या मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी, फायनान्स कंपनी जसा गंडा घालण्याचे हेतूने तयार केल्या जातात तशाच पद्धतीची कार्यप्रणाली आ. जगताप यांची या प्रकरणामध्ये आहे.

या ठिकाणी आयटी पार्कच्या नावाखाली मुलांना केवळ डाटा एंट्रीचे काम करायला लावले गेले. आठ ते बारा हजार रुपयांचा केवळ एक महिन्याचा पगार त्यांच्या हातात टेकवला गेला. दोन ते पाच महिन्यांचा पगार शेकडो मुलांचा यांनी बुडवला आणि कोट्यवधी रुपयांना नगर शहरातील तरुणांना गंडा घालण्यात आला. फसवणूक झालेल्या अनेक तरुणांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे. आमची आ. जगताप यांनी फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तुमच्यावर अन्याय झाला आहे असे तुमचे म्हणणे आहे तर तुम्ही याबद्दल पोलिसात तक्रार करा असे आम्ही या तरुणांना सुचवले. त्यावेळी यापैकी कोणीही जिवाच्या भीतीपोटी तक्रार करायला तयार नाही. जगतापांच्या दहशतीमुळे आमच्या जीवाला धोका होऊ शकतो. पैसे नाही मिळाले तरी चालतील पण आम्हाला आमचा प्राण प्रिय आहे अशी भीती यावेळी या मुलांनी, त्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

दहशतीमुळे तरुणाई हतबल आहे. हे या शहराचे दुर्दैव आहे. म्हणून काँग्रेसने आ.जगताप यांच्या या कृत्याची पोलखोल करत तरुणाईला जागृत करण्याचे काम केले असून इथून पुढे कोणीही आ.जगताप यांच्या आयटीपार्कच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नये असे आवाहन किरण काळे यांनी नगर शहरातील तरुणांना केले असून आपण सतर्क रहा अन्यथा तुमची देखील अशीच फसवणूक होऊ शकते असे म्हटले आहे.

📌 चार दिवसांच्या आत आयटी पार्क मध्ये चर्चेला येण्याचे काळेंचे जगतापांना खुले आव्हान : आयटी पार्कची आम्ही पोलखोल केलीच आहे. भयाण वास्तव नगरकरां समोर आणले आहे. नगर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरा तसेच नोकरी देण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या तरूणाई समोर आपण या ठिकाणी मोठी भाषणबाजी केली.

त्या सर्वांना पुन्हा एकदा आपण निमंत्रित करू आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी जाहीर प्रश्न विचारून त्या जाहीर प्रश्नांची आपण पुराव्यानिशी जाहीरपणे खरी उत्तरे द्या असे आव्हान किरण काळे यांनी आ. संग्राम जगताप यांना दिले आहे. आपण चार दिवसांच्या आत या चर्चेसाठी यावे असे काळे यांनी आव्हान दिले आहे. आ. जगताप आता हे आव्हान स्वीकारतात की नाही याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe