अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- पारनेरचे आ.निलेश लंके यांची मी पारनेर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गेलो असता माझ्या सहकाऱ्यां समवेत सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून सदिच्छा भेट होती.
या भेटीबाबत अनेक राजकीय स्वरूपाची चर्चा समाज माध्यमांमधून आणि इतर व्यासपीठांवरून सुरू आहे. या भेटीचा विपर्यास यातून झाल्याचे दिसते. आ. लंके यांना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या एवढेच या भेटीत घडले असा खुलासा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
काळे याबाबत म्हणाले की, नगर शहरामध्ये काँग्रेसचे काम करत असताना जिल्हा युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हा समन्वयक या नात्याने नगर शहरासह पारनेर आणि सबंध जिल्ह्यामध्ये माझा संपर्क असतो. त्या निमित्ताने अनेक युवक कार्यकर्ते माझ्या संपर्कात असतात.
त्या निमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी सातत्याने माझ्या सुरू असतात. पारनेर, सुपा परिसरातील काही युवक कार्यकर्ते यांच्या निमंत्रणावरुन गेलो असताना आ.लंके हांग्यात असल्याचे समजले. यापूर्वी देखील आमच्या भेटी झाल्या आहेत. तशीच ही भेट होती.
मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महाविकास आघाडी सरकारमधील सहकारी घटक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी या सातत्याने होत असतात. मात्र या भेटीगाठींचा राजकीय विपर्यास करणे हे योग्य नाही.
एकमेकाचा सत्कार करणे यात काही गैर असण्याचे कारण नाही आणि याला राजकीय संदर्भ जोडण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे आ.लंके यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा करण्याच्या संबंधच येत नाही असे काळे यांनी म्हटले आहे.
कुणाचे कुणाशी राजकीय मतभेद असतील तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकारणात या गोष्टी सुरू असतात. नगर शहरात काम करत असताना राजकीय संघर्ष करण्यासाठी मी, माझे सहकारी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सक्षम आहोत.
नगर दक्षिणेत कुणाचे कुणाबरोबर काय चालू आहे यात आपल्याला रस नसून नगर शहरातील नागरी प्रश्नावर काम करण्याशी आमची बांधिलकी आहे. या भेटीचा निव्वळ राजकीय विपर्यास झाला असून या गोष्टीला मी फारसे महत्त्व देत नाही. इतर कोणी देखील ते देऊ नये, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम