अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यातून कोरोना पायउतार होऊ लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता काहीशी घटताना दिसून येत आहे. यातच अनेक तालुक्यातील गावांचा प्रवास हा कोरोनामुक्तीकडे सुरु आहे.
यातच नगरकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नगर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, ११० गावांपैकी ५७ गावांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ५३ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. सद्य:स्थितीत १६० सक्रिय रुग्ण असून, आजतागायत ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील आठवड्यात सक्रिय रुग्णांचा आकडा दोनशेच्यावर होता. चालू महिन्यात एकही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत तालुक्यात १६ हजार ७३९ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची लोकसंख्या एक लाख ३९ हजार ९४४ एवढी आहे.
नगर तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत आहे. ही समाधानाची बाब असली तरी तिसरी लाट गृहीत धरून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पहावयास मिळते. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, नियमांचे पालन होत असल्याने कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम