अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना, एकाच दिवशी एका व्यक्तीने केलेल्या कोरोना चाचणीचा जिल्हा रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह, तर खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने, अशा दोन प्रकारच्या अहवालाबाबत संशय निर्माण झाला आहे.
यासंदर्भात चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन विश्व मानवाधिकार परिषदच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले.
यावेळी विश्व मानवाधिकार परिषदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद शफीबाबा, जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, अल्ताफ शेख, उपजिल्हाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव शब्बीर शेख, सचिव मुजम्मिल पठाण, ललित कांबळे, शादाब कुरेशी, ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, वाहिद शेख आदी उपस्थित होते.
कोठी येथील चंद्रकांत उजागरे यांनी अस्वस्थता जाणवत असल्याने शंकेचे निरसन करण्यासाठी सावेडी येथील भूमी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दि.18 मार्चला कोरोनाची तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
याबाबत अधिक खात्री करण्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्याच दिवशी कोरोनाची तपासणी करुन घेतली. याचा अहवाल दोन दिवसांनी निगेटिव्ह आल्याने ते चक्रावले. एकाच दिवशी एका व्यक्तीचे कोरोना तपासणीचे निगेटिव्ह व पॉझिटिव्ह अशा दोन प्रकारचे अहवाल आले आहे.
एकावेळी एकाच माणसाचे दोन वेगवेगळे कोरोना तपासणी अहवाल येत असल्याने कोणत्या अहवालावर विश्वास ठेवायचा ह प्रश्न पडला आहे. एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढणार आहे.
तर तो व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असून, पॉझिटिव्ह दाखविल्यास उपचारा दरम्यान काही कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? अशा तपासणी अहवालामुळे प्रश्न व शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर 420 चे गुन्हे दाखल करण्याची मागणी विश्व मानवाधिकार परिषदच्या वतीने करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|