अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- राज्यातील क्रीडा शिक्षकांची भरती अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. क्रीडा शिक्षक याकडे आस लाऊन बसले आहेत. राज्य शासनाने या बाबतीमध्ये निर्णय करत तातडीने या भरतीची प्रक्रिया सुरू करावी,
अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहेत. नुकताच ना. थोरात यांचा नगर दौरा पार पडला.
यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ना. थोरात यांची शासकीय विश्रामगृह याठिकाणी समक्ष भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली. काँग्रेस क्रीडा विभाग शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी ना. थोरात यांच्या समवेत क्रीडा शिक्षकांच्या प्रलंबित भरती बाबत तसेच विविध समस्यांबाबत चर्चा केली.
यावेळी आ.डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थित होते. कोरोनाचे संकट मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. क्रीडा शिक्षक यांचे यामध्ये अतोनात हाल झाले आहेत. त्यांना शाळांकडून मानधन मिळालेले नाही.
त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे सायंकाळी व सकाळच्या सत्रामध्ये खाजगी क्रीडा वर्ग देखील भरवण्यास मर्यादा पडल्यामुळे त्यांना मिळणारे मासिक उत्पन्न मिळू शकलेले नाही. यातच क्रीडा शिक्षकांची भरती ही प्रलंबित असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे.
त्यामुळे त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी क्रीडा काँग्रेसच्या वतीने महसूलमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहेत. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, शहर क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंके, खजिनदार नारायण कराळे,
संघटक प्रसाद पाटोळे, सरचिटणीस महेश निकम, सहसचिव आदील सय्यद, युवक कांग्रेस उपाध्यक्ष विशाल घोलप, काँग्रेस शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, सुरज गुंजाळ, अजय घोलप आदींसह पदाधिकारी, क्रीडापटू उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम