कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होऊन जग वर्चुअल झाले -दादाभाऊ कळमकर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- स्पर्धेच्या युगात स्मार्ट शिक्षण पध्दतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होऊन जग वर्चुअल झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पध्दती रुजली गेली.

मात्र ऑनलाईन शिक्षण देताना ते अधिक दर्जेदार व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने विकसीत केलेला मोबाईल अ‍ॅप विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी विकसीत करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभ कळमकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमहापौर गणेश भोसले,

हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, बापूसाहेब ओव्हळ, रयतचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, अशोक बाबर, माजी लेखापरीक्षक विश्‍वासराव काळे, उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके,

राजनारायण पांडूळे, अनुसंगम शिंदे आदिंसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना दादाभाऊ कळमकर म्हणाले की, रयतने सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली. कर्मवीरांनी लावलेल्या रोपटेचे वटवृक्ष बहरले असून, अद्यावत व दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून रयतचा नांवलौकिक झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, जग झपाट्याने बदलत असताना नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार केला गेला पाहिजे. शिक्षण ऑनलाईन होत असताना ते गुणवत्तापुर्ण होण्यासाठी भविष्याच्या दृष्टीकोनातून शाळेने उचललेले पाऊल दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. अविनाश घुले यांनी ऑनलाईन शिक्षण काळाची गरज बनली आहे.

जगातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी ही शिक्षण पध्दती उपयुक्त बनली असून, याचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांचा विकास साधला जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात असून, ते अधिक गुणवत्तापुर्ण होण्यासाठी या अ‍ॅपची सुरुवात करण्यात आल्याचे सांगून अ‍ॅपबद्दल माहिती दिली.

ज्ञानदेव पांडूळे यांनी सर्वसामान्य श्रमिकांची मुले या शाळेत शिक्षण घेत असून, गुणवत्तेच्या बाबतीत ते आघाडीवर असल्याचे सांगितले. सदर मोबाईल अ‍ॅप विकसीत करणारे ब्राईट पिच सोल्युशनचे जगधने सर व विजय भोर यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ व प्रदिप पालवे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe