अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील चितळी येथे गेल्या १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
याला येथील अवैध दारू व मटक्याचे अड्डे कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे हे सर्व अड्डे येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक नागरिक जीव वाचवत असताना परिसरात चितळी येथील अवैध दारूविक्री व मटक्याचे अड्डे राजरोजपणे सर्रास चालू आहेत.
अनेक ज्येष्ठ मंडळी व ग्रामपंचायत यांच्या वतीने समज देऊनही आम्ही पोलिसांचे खिसे गरम करतो, असे उत्तर दिले जाते.
त्यामुळे कायद्याचा काहीच धाक नाही का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथील आरोग्य विभाग व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन वेळेस शिबिराचे आयोजन करून, गाव व वाड्या वस्त्यांवर जंतूनाशक फवारणी केली.
एकीकडे येथील जनता रोजच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीने भयभीत झाली असून दुसरीकडे या अवैध धंद्यांच्या ठिकाणी दिवसभर परिसरातील लोकांची वर्दळ चालू असल्याने कोरोना पसरविण्याचे मोठे उगमस्थान चितळी गाव व स्टेशन बनले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|