कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी न्यायाधीश एम.व्ही. कुरतडीकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, सरकारी वकिल अ‍ॅड. सतीश पाटील व्यासपिठावर उपस्थित होते.

प्रारंभी कोरोना काळात मयत झालेल्या वकिल बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी एका कुटुंबाप्रमाणे अहमदनगर बार असोसिएशन कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या दु:खात सहभागी झाले असून, त्यांनी केलेली मदत प्रेरणादायी असल्याची भावना यक्त केली.

बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे म्हणाले की, कोरोनाने अहमदनगर बार असोसिएशनच्या काही सदस्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेले दु:ख व झालेले नुकसान भरुन निघणारे नाही.

मात्र कुटुंबातील सदस्य म्हणून, या बांधवांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी खारीचा वाटा उचलत बार असोसिएशनने मदत केली असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोना काळात मदत करणार्‍या वकिल सभासदांचे त्यांनी आभार मानले. यावेळी मदतीचे धनादेश मयत विधीज्ञाच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुहास टोणे यांनी केले. यावेळी केंद्र सरकारचे अ‍ॅड. सुभाष भोर, अ‍ॅड. भानुदास होले, बारचे कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. सुनिल तोडकर, सहा. सरकारी वकिल अ‍ॅड. संजय पाटील, अ‍ॅड. अनिल घोडके, अ‍ॅड. जय भोसले, अ‍ॅड. युवराज पाटील, अ‍ॅड. गौरव दांगट आदी वकिल मंडळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe