कोरोनाचा फटका: जिल्ह्यातील ‘ती’ प्रसिध्द यात्रा रद्द !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-होळीपासून गुढीपाडव्या पर्यंत चालणारी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

प्रथा परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणाऱ्या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील अशी माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली.

राज्यातील भटक्यांची पंढरी म्हणून मढी देवस्थानकडे पाहिले जाते. अठरापगड जातीचे बांधव यात्रेसाठी येऊन येथे परंपरेप्रमाणे धार्मिक विधी करतात.

गावाची सार्वजनीक होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला असून या दिवशी गोपाळ समाजातील मानकरी, निवडक विश्वस्त, पुजारी आदींच्या उपस्थित होळी पेटविली जाईल.

अन्य भाविकांना गावात प्रवेश मिळणार नाही. मढीला येणाऱ्या सर्व बाजूंच्या रस्त्यावर गावाच्या हद्दीवर पोलीस व देवस्थान समितीतर्फे बँरीकेटींग करून यात्रेकरुंना गावात प्रवेश मिळणार नाही.

यात्रेनिमित्त सर्व व्यवसाय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. गर्दीच्या दिवशी म्हणजे चतुर्थी,रंगपंचमी व षष्ठीच्या दिवशी संचार बंदी आदेश जारी करायचा,

यात्रा पूर्ण बंद करायची,की देवाच्या काठ्या बरोबर पाच व्यक्तींना प्रवेश द्यायचा याचा निर्णय १५ तारखेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जाईल.

त्यांच्याकडून मिळणाऱ्या आदेशानुसार यात्रेच्या पुढचा टप्प्या विषयी निर्णय घेतला जाईल. देवस्थान समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची यात्रेपूर्वी कोरोना चाचणी केली जाईल.

दरवर्षी एस.टी.कडून यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्या यावर्षी सोडण्यात येणार नाहीत. कोणीही भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये.

यात्रेपूर्वी गावात आरोग्य विभागामार्फत धुरळणी,फवारणी व गावातील पाणवठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. मास्क ची तपासणी,

सामाजिक आंतर पडताळणी पथक कार्यरत करण्यात येऊन यात्रा बंद असल्याबाबतची माहिती सर्वत्र फलक लावून देवस्थान समितीने जाहीर करावी. अशा सुचना यावेळी झालेल्या बैठकीत करण्यात आल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe