शिर्डीच्या साई मंदिरालाही कोरोनाचा आर्थिक फटका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली होती.

यामुळे या बंदचा मोठा फटका मंदिरांना बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साई मंदिराला एका वर्षात तब्बल 286 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 1 एप्रिल 2020 ते 26 मे 2021 या कालावधीत संस्थानला ऑनलाइनच्या माध्यमातून केवळ 94 कोटींचे दान प्राप्त झाले आहे.

मंदिर बंद असल्याने ऑनलाइनच्या माध्यमातून संस्थानला 94 कोटी दान प्राप्त झाले. 2019-2020च्या तुलनेत 286 कोटींची घट झाली आहे. त्यावेळी 362 कोटींचे दान प्राप्त झाले होते. दरम्यान साईबाबा मंदिराला वर्षाकाठी दीड कोटींहून अधिक भाविक भेट देतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर 17 मार्च 2020 पासून बंद झाले. त्यानंतर 16 नोव्हेंबरला राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे खुली झाली. साईदर्शनासाठी भाविकांची मांदियाळी सुरू झाली आणि काही प्रमाणात दानाच्या रकमेतही वाढ होत गेली,

मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढलेली रुग्णसंख्या पाहता पुन्हा 5 एप्रिल 2021 पासून साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी अद्यापही बंदी आहे. यामुळे भाविक साईंच्या दर्शनापासून वंचित राहू लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe