शहरात ठेकेदाराने खोदलेले खड्डे मनपा नागरिकांच्या पैशातून बुजविणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  नगर आणि खड्डे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून मिळते जुळते समीकरण आहे. यातच विकासात्मक कामे होऊ अथवा नाही मात्र शहरात दरदिवशी कोठेनाकोठे रस्ते खोदून खड्डे करून ठेवलेली असतातच हे नित्याचे झाले आहे.

यातच फेज-२ पाणी योजनेचे पाईप टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांत मोठे खड्डे पडलेले आहेत. ठेकेेदाराने केलेले खड्डे पालिकेकडून बुजविण्यात येणार असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे.

सध्याच्या स्थितीला नगर शहरात फेज-२ पाणी योजनेचे काम सुरू आहे. रस्ते खोदून त्यात पाणी योजनेचे पाईप टाकण्यात येत आहेत. ही योजना गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. पाणी योजनेचे पाईप टाकण्यासाठी ठेकेदाराने अक्षरश: रस्त्याची चाळण केली आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल झाला आहे.

दरम्यान फेज-२ च्या निविदेत पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते ठेकेदाराने बुजवावेत, अशी अटच नव्हती, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते बुजविण्याची जबाबदारी ठेकेदाराचीच आहे.

तशी अट फेज-२ पाणी योजनेच्या निविदेत आहे, असे बांधकाम विभागाने प्रस्तावात नमूद केले आहे. पाणीपुरवठा विभागाने तशी अट नसल्याचे नमूद केले असून, खड्डे बुजविण्याचा खर्च महापालिकेने करावा कसा असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने पैसे घेतले. त्यासाठी ठेकेदाराने शहरातील रस्ते खोदले. रस्ते खोदाईमुळे पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून पैसा खर्च केला जात असून, ही एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या पैशाची उधळपट्टीच ना , असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान ठेकेेदाराने केलेले खड्डे पालिकेकडून बुजविण्यात येणार असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. स्थायी समिती हा प्रस्ताव फेटाळणार की खड्ड्यांवर तिजोरी रिकामी करणार, ते पहावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe