अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-मुंबईच्या तळोजातील एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तळोजा पोलिसांनी स्वत: तक्रारदार होऊन गुन्हा दाखल केला आहे.
शेवंती शिंदे (८५) असे वृद्ध महिलेचे नाव असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव अशोक शिंदे (५०) असे आहे. अशोक ठाण्यात शिवाई नगरमध्ये कुटुंबासह राहतो, तर शेवंता यांची विवाहित मुलगी खोपोली येथे राहते.
शेवंता यांना मुलगा-मुलगी असतानाही त्या चार-पाच वर्षांपासून तळोजा घोटकॅम्पमधील कोयनावेळे येथील भाच्याकडे राहण्यास होत्या. महिनाभरापूर्वी त्या इतर नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या होत्या.
मात्र त्यांनी महिनाभरानंतर त्यांचा सांभाळ करण्यास नकार देऊन परत पाठवले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या शेवंता यांनी तळोजा पोलीस ठाण्यात जाऊन आपली कहाणी पोलिसांना कथन केली.
पोलिसांनी मुलगा अशोक यांना आपल्या आईला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्याने पोलीस ठाण्यात येण्यास नकार देऊन आपल्या आईला घेऊन जाणार नसल्याचे सांगितले. पोलिसांनी शेवंता
यांच्या खोपोली येथील मुलगी रंजना मोरे हिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मोबाईल फोन बंद आल्याने पोलिसांनी अन्य नातेवाईकांना संपर्क साधून शेवंता यांना घेऊन जाण्याची विनंती केली.
मात्र त्यांनीही त्यांचा सांभाळ करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी शेवंता यांना सुरक्षेच्या दृष्टीने तळोजा घोट कॅम्प येथील परमशांती धाम वृद्धाश्रमात ठेवले. तळोजा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन
आपल्या आईचा सांभाळ करण्यास नकार देणऱ्या अशोक शिंदेविरोधात आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|