Ahmednagar News : खुर्ची सांभाळणे एवढेच काम राज्यातील सत्ताधाऱ्यांना आहे. गुन्हेगारांना शासनाची भीती वाटत नाही. आमदारच गोळीबार करत आहेत. राज्यात कोठे न कोठे रोज गोळीबाराची घटना घडते आहे.
राज्यातील सर्व सामान्य जनता भयभित आहे. या शब्दात माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. तसेच प्रधानमंत्री मोदी यांच्या योजनांच्या घोषणेत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत तफावत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली. त्यानंतर आमदार तनपुरे पत्रकारांशी बोलताना तनपुरे यांनी केंद्र आणि राज्य सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
तनपुरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये तफावत आहे. हर घर जल म्हणून जलजीवन योजना राबविली जात आहे. प्रत्येक घराला पाणी दिले जाईल, असे सांगितले जात आहे.
मात्र प्रत्यक्षात २० घरांची वस्ती असेल तरच पाणी योजना राबविली जाणार आहे. या योजनेवर हजारो कोटींचा खर्च होत आहे. योजनेच्या दर्जा योग्य नाही, त्यामुळे ही योजना किती काळ चालेल, याची खात्री नाही, असे तनपुरे म्हणाले.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलामध्ये पूर्वी दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद केली आहे. या योजना सुरू ठेवण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प उभारून या योजनांना वीज उपलब्ध करून देणे गरजेचे होते, असे त्यांनी नमूद केले.
लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष ही महत्वाचा असतो. मात्र, तपास यंत्रणांचा धाक दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडले जात आहे. विरोधी पक्ष नष्ट करणे म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.













