अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी उन्हाळ्यातील दुसरे मोठे आवर्तन निळवंड्यातून बुधवारी सोडण्यात आले.
सकाळी १० वाजता १४५० क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील गावांत आनंद व्यक्त केला. पाण्याअभावी सुकत चाललेल्या उभ्या रब्बी पिकांना या आवर्तनामुळे जीवदान मिळणार आहे.
नदीकाठावरील गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासही मदत होईल. एक महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार असल्याची माहिती अहमदनगर येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी दिली.
हे आवर्तन सोडण्यापूर्वी बुधवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा ७३५.८१० मीटर म्हणजेच ६ हजार २५७ दलघफू व निळवंडे धरणात ६३०.०२० मीटर म्हणजेच ३ हजार ८७० दलघफू इतका होता.
या आवर्तनात सिंचनासाठी यापैकी ३ हजार दलघफू (३ टीएमसी) पाण्याचा वापर अपेक्षित आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.
यावर्षी भंडारदऱ्यातून खरीप हंगामाचे एक आणि रब्बी हंगामाचे एक अशी दोन आवर्तने देण्यात आली आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|