Cyclone Biparjoy: दक्षिण-मध्य अरबी समुद्रातून उगम पावलेले चक्रीवादळ बिपरजॉय 16 जून रोजी गुजरातमध्ये धडकल्यानंतर आता वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. बिपरजॉयमुळे गुजरातमधील 940 गावे प्रभावित झाली आहेत. वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये हवामानावर परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्येही पाऊस पडेल.
हवामान विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय ईशान्येकडे सरकले आणि गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र-कच्छ पाकिस्तानच्या किनारपट्टीला ओलांडले. चक्रीवादळ आता समुद्रातून जमिनीकडे सरकले आहे आणि ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने केंद्रीत झाले आहे. चक्रीवादळाची तीव्रता अतिशय तीव्र चक्री वादळात बदलली आहे.
महापात्रा यांनी सांगितले की, बिपरजॉय हे तीव्र चक्रीवादळ आज दुपारी 2:30 वाजता नलियाच्या 30 किमी उत्तरेस सौराष्ट्र-कच्छ प्रदेशावर केंद्रित झाले आहे. ते ईशान्येकडे सरकण्याची आणि 16 जूनच्या सकाळपर्यंत चक्रीवादळात कमकुवत होऊन त्याच संध्याकाळी दक्षिण राजस्थान मध्ये जाईल.
99 गाड्या रद्द, रेल्वेमंत्र्यांनी घेतला आढावा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चक्रीवादळ बिपरजॉय संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सध्या गुजरातमधील बंदरे बंद करण्यात आली आहेत. उड्डाणे आणि गाड्यांचे संचालन बंद करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने जवळपास 99 गाड्या रद्द केल्या आहेत.
गुजरातमधील 45 गावांतील वीज व्यवस्था प्रभावित
गुजरातमधील मोरबीमध्ये वीज यंत्रणा सर्वाधिक प्रभावित झाली आहे. वीज विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा आणि खांब तुटले, त्यामुळे माळीया तालुक्यातील 45 गावांमध्ये वीज नाही, त्यापैकी 9 गावांमध्ये वीज सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित गावांमध्ये वीज सुरळीत केली आहे.
गुजरातचे आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितले की, चक्रीवादळ सध्या कच्छ-पाकिस्तान सीमेला स्पर्श करत असून वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 78 किमी होता. विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वीज नव्हती. आयएमडीच्या अंदाजानुसार, वादळ उद्या दक्षिण राजस्थानमध्ये पोहोचेल आणि तेथे पाऊस पाडेल. सखल भागात लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता आहे. आज गुजरातमध्ये पावसाची शक्यता असून, त्यात कच्छ, पाटण, बनासकांठामध्ये अधिक पाऊस पडेल.