अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील दूधउत्पादक शेतकऱ्यांना सुमारे आठ लाखांचा चुना लावून एक दूध डेअरी चालक पसार झाला आहे.
याबाबत नाशिक पोलीस परीक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील एक दूध डेअरीचालक तांदुळवाडी आरडगाव परिसरातील
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/11/2chori_16.jpg)
शेतकऱ्यांचे दूध खरेदी करून एका नामवंत दूध प्लॅन्टला वितरित करीत होता; परंतु वैयक्तिक कारणांमुळे हा दूध डेअरी चालक गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता.
त्यामुळे संबंधित दूध प्लॅन्टच्या मालकाकडे दुधाच्या वितरणापोटी ॲडव्हान्सची मागणी करत होता, तसेच काही खाजगी सावकारांकडेदेखील पैशांची मागणी करत होता.
परंतु कोणताच मार्ग सापडत नसल्याने अखेर ५ जानेवारी २०२१ रोजी संबंधित डेअरी चालकाने या भागतील शेतकऱ्यांच्या दुधाचे सुमारे आठ लाख रुपये पेमेंट स्वत: परस्पर काढून घेऊन पोबारा केला आहे.
शेतकऱ्यांचे दूध संकलन अचानक बंद झाल्याने पेमेंट अडकलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही; याबाबत संबंधित डेअरी चालकाच्या कुटुंबियांनी राहुरी पोलिसांत ही व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली आहे.
सदरची व्यक्ती सापडत नसल्याने तसेच पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी थेट नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालय गाठून तक्रार अर्ज सादर केला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|