अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवेळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी संकटामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.
तसेच वीज पडून आव्हाने खुर्द येथे एका शेळीचा पिलासह मुत्यू झाला तर पाथर्डी तालुक्यातील मौजे मालेवाडी येथील एक व्यक्ती वीज पडून जखमी झाली आहे.

या अवकाळी नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.शनिवार दि.२० मार्च रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाली.
शेवगाव तालुक्यातील मौजे आखेगाव ति.,आखेगाव डोंगर, खानापूर, शेकटे खुर्द, गोळेगाव, नागलवाडी, लाडजळगाव, थाटे आणि वडगाव या परिसरातील शेतीपिकांचे नुकसान झाले.
तर आव्हाने खुर्द येथे वीज कोसळून एक शेळी पिलासह मुत्यूमुखी पडली. संगमनेर तालुक्यातील खांबे, शिंदोडी, खंडेरायवाडी, कौठे मलकापूर आणि रणखांबवाडी या गावांच्या शिवारात गहू, कांदा,
टोमॅटो, चारापिके, डाळींब, कागदी लिंबू असे ८७८ शेतकऱ्यांचे ३५७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तसेच पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव, डांगेवाडी, खेर्डे, हत्राळ, चितळी, पाडळी, ढवळेवाडी, साकेगाव,
काळेगाव फकिर,वसु, सुसरे, कोरडगाव, औरंगपूर, कळ्सपिंप्री, तोंडळी, भुतेटाकळी, पाथर्डी, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, सोमठाणेबुद्रुक,सोमठाणे नलावडे, माळेगाव,
प्रभूपिंप्री या गावांच्या शिवारातील ३०६ हेक्टर ९० आर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मौजे मालेवाडी येथे वीज पडून माणिक ज्ञानोबा दराडे ( वय ५५) हे जखमी झाले.
तसेच राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील कोळेवाडी, चिखलठाण, वावरथ आणि जांभळी शिवारातील तब्बल ३ हजार ७३० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.
नेवासे तालुक्यातील मौजे तरवडी आणि मौजे सुलतानपूर येथील ३६ हेक्टर क्षेत्रास अवकाळीचा तडाखा बसला आहे. नुकसानीचा हा प्राथमिक अहवाल असून
३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्र याचा बाधित शेतकरी संख्येनिहाय अंतिम अहवाल करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|