कर्जदाराची फसवणूक : महानगर बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह अन्य एकावर गुन्हा दाखल!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  आपल्या उद्योगासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या मुंबई येथील कर्जदाराला बँकेने जप्त केलेला प्रकल्प बिनशेती केलेल्या जमिनीवर असल्याचे भासवून त्याची ६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महानगर बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह अन्य एका जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील नितीन अंबादास पिसे या कागदी पिशव्या तयार करणाऱ्या उद्योजकाने २०१५ मध्ये नवीन युनिट घेण्यासाठी दि महानगर को-ऑप बँकेच्या तुर्भे (मुंबई) शाखेकडे कर्जमागणी केली होती. त्यांच्या अर्जनुसार त्यांचे १२ लाखाचे कर्ज मंजूर केले. हि रक्कमही बँकेकडून वर्ग करण्यात आली; मात्र कर्जदाराला आपल्याच खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम तांत्रिक कारणांनी काढता येत नव्हती.

याबाबत बँकेत विचारणा केली असता तेथील व्यवस्थापकाने तुमचे खाते चालू खात्याच्या श्रेणीतील असल्याने तुम्हाला पैसे काढता येत नाही, त्यासाठी तुम्हाला कॅश क्रेडीट खाते उघडावे लागेल, असे सांगितले. या सर्व घडामोडीत १५ दिवसांचा कालावधी गेला. या काळात  महानगर बँकेच्या तुर्भे शाखेचा व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ याने संबंधित कर्जदाराला फोन करुन ‘तुमच्यासाठी एक चांगली ऑफर’ असल्याचे सांगत त्यांना संगमनेर येथील कागदी बॉक्स बनविण्याचा एक कारखाना आम्ही थकबाकीपोटी जप्त केलेला असल्याचे त्यांना सांगितले.

मात्र पिसे यांनी कारखाना घेण्यास असमर्थतता दर्शविली. महानगर बँकेच्या व्यवस्थापकाने पिसे यांना बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या दालनात नेऊन त्यांच्याशी भेट घडवून आणली. त्यांच्याकडून संबंधित कर्जदाराला तशीच ऑफर देण्यात आली; मात्र आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले; मात्र महानगर बँकेकडून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा बँकेत जाऊन चौकशी केली.

बँकेच्या व्यवस्थापकाने पुन्हा संगमनेरचा कारखाना घेण्याचा आग्रह केला. तो मान्य करुन पिसे यांनी कारखाना ६५ लाख रुपयांत घेण्याची तयारी दाखवली. त्यानंतर व्यवस्थापक तराळ याने लागलीच ज्ञानदेव सुराजी मते (रा. ठाणे) या दलालासोबत संगमनेरात येऊन पाहणी केली व सर्व व्यवहार पूर्ण झाला.

ऑगस्ट २०१९ पर्यंत पिसे यांनी ती कंपनी चालविली; मात्र डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना संगमनेर तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावल्याने ही जागा अनधिकृत बिनशेती असल्याचे त्यांना समजले.यानंतर पिसे यांनी याची पूर्ण माहिती मिळवली. यात ती जमीन शेतजमीन असतानाही बिनशेती भासवली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यामुळे पिसे यांनी व्यवस्थापक पंढरीनाथ तराळ (रा. ऐरोली, नवी मुंबई) व दलाल ज्ञानदेव सुराजी मते (रा. ठाणे) या दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe