अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- नगर अर्बन बँकेच्या तोट्यात असलेल्या शाखा बंद करण्याचा निर्णय बँक प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये घेतला आहे. या निर्णयानुसार बँकेच्या शिर्डी, कोपरगाव, चंदननगर (पुणे), दौंड या ४ शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती बँकेचे प्रशासकीय अधिकारी सतीश शिंगटे यांनी दिली. बँकेच्या प्रशासकीय खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्बन बँकेने गेल्या १ एप्रिलपासून चाकण व सिन्नर शाखाही बंद केल्या आहेत.
आगामी काळात बँकेच्या आणखीही काही शाखा बंद होऊ शकतात. मात्र, अर्बन बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून खातेदारांनी अशा निर्णयांमुळे गोंधळून जाऊ नये, असे आवाहन बँक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
नगर अर्बन बँक सध्या वसुलीच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलत असून, आतापर्यंत सुमारे १०० च्या वर थकबाकीदारांना सिक्युरिटायझेशन अॅक्टनुसार (वसुली कायदा) नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातून बँकेची थकबाकी वसूल करण्यात येत आहे.
लॉकडाऊन शिथिलतेच्या काळात बँकेने फेबु्रवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीत ४० कोटींपेक्षा जास्त वसुली केलेली आहे. परंतु सध्याच्या लॉकडाऊनमुळे सदरील प्रक्रिया काही दिवस प्रलंबित असून लवकरच यास पुन्हा गती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
अर्बन बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून बँकेचे ठेवीदार, खातेदार यांना वेळेवर रक्कम दिली जात आहे. ठेवीदारांच्या विश्वासाच्या बळावर बँकेच्या मुदत ठेवींमध्येही वाढ होत आहे. सोनेतारण व घर कर्जासाठीही अनेकांकडून मागणी होत आहे.
सध्याच्या कोरोना काळातही बँकेचे खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांना उत्तम सेवा बँक कर्मचाऱ्यांकडून निर्बंध पाळून देण्यात येत असल्याचे श्री.शिंगटे म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम